computer

गावसकरची वर्ल्डकपमधली सर्वात वाईट खेळी, नक्की काय काय घडलं तेव्हा ??

सध्या फास्ट जमाना आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट फास्ट पाहिजे आहे. 4 G जाऊन आता 5 G येऊ घातले आहे. बुलेट ट्रेन सुरू होत आहे. वेगवान कार्स मार्केटमध्ये येत आहेत. तर मग अशाकाळात जगातला सर्वात लोकप्रिय खेळ असलेले क्रिकेट कसे मागे राहिल? क्रिकेट तर कधीच फास्ट झाले आहे. आता T20 आणि आयपीएलचा जमाना आहे. एका ओव्हरमध्ये ६ सिक्स आणि T20 च्या एका इनिंगमध्ये सहज शतक ठोकणे आता नेहमीचे झाले आहे मंडळी!! एक से बढकर एक शॉट आता प्रसिद्ध झाले आहेत. धोनीचा हेलीकॉप्टर शॉट, सेहवागचा अप्पर कट, दिलशानचा दिल स्कूप, असे अनेक शॉट प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. T20 चा प्रभाव एवढा वाढला आहे कि, आता वनडेमध्ये सुद्धा बॅट्समन मुसळधार बॅटिंग करत असतात. कमीतकमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समन करत असतो.

आणि मंडळी,  आता अशावेळी जर तुम्हाला कुणी सांगितले कि, एका वनडे मॅचमध्ये बॅटिंगला आलेला बॅट्समन शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला आणि त्याने रन किती केले तर ३६!!  विश्वास बसेल तुमचा? पण मंडळी हे खरे आहे. हा पराक्रम झाला होता ७ जून १९७५ साली. तब्बल १७४ बॉल्स खेळून त्या बॅट्समनच्या नावावर धावा होत्या, फक्त ३६! आणि प्लेयर म्हणजे साधासुधा नव्हता. या भाऊने पुढे जाऊन टेस्टमध्ये सर्वात जास्त शतकांचा रेकॉर्ड केला. तो म्हणजे आपला लिटल मास्टर सुनील गावस्कर!!

१९७५  साली पहिला वर्ल्डकप भरवण्यात आला होता. त्याकाळी भारत आतासारखा बलवान नव्हता. सिरीजमध्ये एक-दोन मॅचेस जिंकल्या तरी भारतात जल्लोष व्हायचा आणि भारताची मॅच ज्यांच्यापासून क्रिकेट सुरू झाले अशा इंग्लंडसारख्या मातब्बर टीमसोबत होती. लॉर्ड्ससारख्या मैदानावर ही मॅच भरवण्यात आली होती. लॉर्ड्सचे मैदान म्हणजे साक्षात क्रिकेटची पंढरीच! पहिलाच वर्ल्डकप असल्याने कुणालाच अनुभव नव्हता. वनडे क्रिकेट पण नविनच सुरू करण्यात आले होते. वनडे क्रिकेट सुरू होऊन फक्त चार वर्ष झाली होती.  आजच्या काळात T20 आल्याआल्या पोप्युलर झाले, तसेच त्याकाळी लोकांना ही वनडे मॅचची कल्पना खुप आवडली होती. सुरुवातीला वनडे मॅच ६० ओव्हर्सची ठेवण्यात आली होती.

गोऱ्या साहेबांची टीम सुरवातीला बॅटिंगला उतरली. आणि धडाधड रन्स करत ६० ओवर्स मध्ये तब्बल ३३४ रन्सचा डोंगर उभा केला. भारताची बॅटिंग आल्यावर आपल्याकडून आपला लाडका सनीभाऊ म्हणजे सुनील गावस्कर ओपनिंगला आला. हा गडी जसा उतरला, तसा आऊट व्हायचे नावच घेत नव्हता. इंग्लंडच्या पूर्ण टीमने याला आऊट करण्यासाठी जंगजंग पछाडले.  पण अत्यंत चिवट बॅटिंग करत हा पठ्ठ्या शेवटच्या ओव्हरपर्यंत नॉट आऊट राहिला. भाऊ पूर्ण १७४ बॉल्स खेळला आणि यामध्ये त्याने थेट एक चौकार मारून ३६ रन्सवर नाबाद राहिला.

यानंतर मात्र सनीभाऊला लई शिव्या खाव्या लागल्या. रन्स होत नव्हते तर आऊट होऊन दुसऱ्यांना तरी संधी द्यायची असे सगळे सांगायला लागले. मात्र जगात या गोष्टीने सगळे आश्चर्यचकीत झाले. हे कसे होऊ शकते असे सगळ्यांना वाटत होते. जगासाठी ही गोष्ट पूर्णतः नवीनच होती. आणि त्यावेळेस सुनील गावस्कर जागतिक क्रिकेटमधले मोठे नाव होते. एकतर हा भाऊ जोरदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध.  त्यात हा एवढ्या हळू बॅटिंग का करतोय हा प्रश्न. आणि भरीस भर म्हणजे एवढा वेळ क्रिझवर टिकून राहण्यासाठी याने एनर्जी कुठून आणली हा पुढचा प्रश्न. एकंदरीत त्या एका इनिंगने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या सनीभाऊबद्दल खूप चर्चा व्हायला सुरुवात झाली. गावस्करने नंतर लिहिलेल्या त्याच्या 'सनी डेज' या आत्मचरित्रात मात्र हे मान्य केले की ती खेळी त्याच्या आयुष्यातली सर्वात वाईट खेळी होती. कारण गावस्करच्या त्या ढिसाळ खेळीमुळे भारताला तब्बल २०२ धावांनी अपमानास्पद पराभव स्वीकारावा लागला. सगळ्यांना वाटत होते की जर गावस्कर रन्स करू शकत नव्हता तर किमान आऊट होऊन दुसऱ्यांना तरी संधी द्यायची होती.  पण या त्याच्या सर्वात वाईट खेळीबद्दल आज अनेक वेगवेगळी कारणे सांगितली जातात.

असं म्हणतात की गावस्करने ती खेळी जाणूनबुजून खेळली. कारण त्याला कॅप्टन व्हायचे होते आणि व्यंकटराघवनला कॅप्टन केल्याने तो दुःखी झाला होता. दुसरे कारण असे पण सांगितले जाते की टीमचे सिलेक्शन करताना त्याला विचारले नाही म्हणून तो नाराज होता. गावस्करला टीममध्ये फास्ट बॉलर्स हवे होते पण टीमने स्पिनर्सना संधी दिल्याने तो नाराज झाला होता. अजून एक तर्क असा आहे कि जर टीम ऑल आऊट झाली असती तर रनरेट कमी होऊन टीमच्या गुणांवर फरक पडला असता आणि आपण वर्ल्डकपच्या बाहेर फेकलो गेलो असतो. म्हणून त्याने स्वतःची विकेट फेकली नाही. पण नंतर स्वतः गावस्करने या सगळया शक्यता नाकारल्या होत्या. गावस्करच्या मते, "मी अनेकवेळा स्टंपच्या बाहेर जाऊन बॅटींग केली, कारण आऊट व्हायचा तोच एक पर्याय होता. माझ्यावर रन्स होत नव्हते म्हणून खूप प्रेशर होते.  या प्रेशरमुळे माझ्याकडून पुढे पण रन्स होत नव्हते. म्हणून मी आऊट व्हायचा पण प्रयत्न केला. पण मी आऊटसुद्धा होत नव्हतो. मी फक्त मशिनप्रमाणे चालत होतो".

पण मंडळी,  ती एक खेळी सोडली तर आपल्या सनीभाऊने भारताच्या क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. वर्ल्डकपमध्ये नाबाद ३६ रन्स खेळणाऱ्या गावस्करने त्याच्या शेवटच्या वर्ल्डकप मध्ये १९८७ साली मात्र स्फोटक १०३ रन्सची खेळी केली होती.

मंडळी, तुमची वर्ल्डकपमधली आवडती खेळी कोणती आहे? आम्हांला तिच्याबद्दल कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. आणि  जगातल्या या आगळ्यावेगळ्या खेळीबद्दल इतरांना पण माहिती व्हावी म्हणून हा जास्तीत जास्त शेअर करा.

 

आणखी वाचा :

जेव्हा धोनीचा सिक्स भारताला वर्ल्डकप जिंकवतो...

वर्ल्ड कप १९९९ : वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून सचिन मैदानात उतरतो.

जेव्हा मॅच हरल्यावर पाकिस्तानी कोचचा मृत्यू होतो....हा खून होता की नैसर्गिक मृत्यू ??

जेव्हा १३ बॉल २२ वरून १ बॉल २२ ला टार्गेट येते...काय घडलं होतं १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनल मध्ये ??

कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!

१९९६ च्या वर्ल्डकप मध्ये ऐन सामन्यात विनोद कांबळी का रडला होता ??

भारताचा क्रिकेटमधला विजय जेव्हा एका ब्रिटिश संपादकाला त्याचा लेख चक्क खायला भाग पाडतो, माहिती आहे का हा भन्नाट किस्सा ??

सबस्क्राईब करा

* indicates required